Total Pageviews

Popular Posts

Friday, January 25, 2013

हरवलेलं सापडलयं की नाही ..

आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?


पुस्तक, पेन, कोरे कागद, नॅपकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू तो परतणारच नाहीये रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो


उघडतो कपाटं, फोडतो कुलपं, पुस्तकं धुंडाळतो, खीसे चाचपतो उद्विग्नपणे
घरात त्याच काय हरवलय आणि कधी काही कळत नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलयं की नाही हेही पुन्हा समजत नाही



कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो ,
गप्प, मलूल बसून राहतो, मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण निसटल्यागत पिंज-यामधून भुर्र दिशी उडून जातो,
जेव्हा परततो, मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून



   उपास, तापास, पूजा-अर्चा सांगुन कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कळोखात हात जोडून काही तरी पुटपुटताना दिसतो
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातां सोबत ..
  
- सौमित्र ( किशोर कदम )




2 comments: